Saturday, January 4, 2020

पायवाट in marathi childhood memory

पायवाट 

आज जुने फोटो बघता बघता अचानक मी थांबले. घरासमोरुन जाणारी ही पायवाट आज मला थेट माझ्या बालपणात घेऊन गेली.
बालपण म्हणजे एक पहाटे पडलेलं गोड स्वप्नचं जणू.....कशाची भीती नाही कशाचीच पर्वा नाही ... आईच्या हातचं जेवण, आईच्या कुशीतली गाढ झोप आणि झोपेत देखील आपल्या इवल्याशा ओठांवरचं गोड हसणं...
आजच्या धावपळीच्या जगात सगळचं हरवत चाललयं हे मात्र खरं.....
सकाळ सुरु व्हायची ती आईच्या हाकेने...तेव्हा कुठे आतासारखा अलार्म होता..? आई अगदी ७ वाजताच ९ वाजले असं सांगून उठवून घालायची. मग पटापट आवराआवर करुन आईच्या बाजूला चुलीकडे जाऊन बसायचे. गरमागरम घावणे व चहा पिण्याची मजाच काही वेगळी होती.... चहा-नाश्ता होताचं पाठीला दप्तर लावून आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींसोबत शाळेत जायला बाहेर पडायचे. मग रस्त्यावरील एखादा दगड पायाने उडवत उडवत  आम्ही केव्हा शाळेत पोहोचायचो कळायचे देखील नाही....
शाळेची घंटा होताच आलाप घेत घेत प्रार्थना म्हणायची व आपापल्या वर्गात जाऊन बसायचे...वर्गात अभ्यासापेक्षा जास्त लक्ष असायचे ते भिंतीवरच्या घड्याळावर ... कधी एकदा एक वाजतो आणि जेवणाची सुट्टी होते असे वाटायचे.. जेवणाची घंटा झाली की सुसाट घरी पळत सुटायचे. घरात पाऊल पडताचं आई ताट वाढायला घ्यायची. हात-पाय धुवेपर्यंत ताटात जेवण वाढलेलं असायचं. बटाट्याच्या कापांचा खमंग वास घरभर पसरलेला असायचा.गरमागरम वरणभात खाऊन मन शांत व्हायचं.मग भरभर पाय उचलत परत शाळा गाठायची. कसाबसा उरलेला दिवस जायचा आणि ५ वाजता शाळा सुटायची. शाळेतून घरी गेल्यावर हात पाय धुणे , कपडे बदलणे,चहा पिऊन झाला की सायकल घेऊन बाहेर फिरायला जाणे हा रोज संध्याकाळचा कार्यक्रम असायचा. मावळणारा सुर्य बघत बघत सायकल चालवण्यात खूप मजा यायची...
रविवार माझा आवडीचा दिवस कारण त्या दिवशी शाळेला सुट्टी असायची. उशिरापर्यंत झोपायला मिळायचं,अभ्यास नसायचा आणि सगळ्यात भारी म्हणजे रविवारचे घरात मासे असायचे. आई मासे साफ करेपर्यंत मला तिथे हातात काठी घेऊन उभे करायची. ते काम मी अगदी चोख पार पाडायचे. एकाही मांजराला मी आईच्या (खरे तर माशांच्या☺️) आसपास देखील फिरकू द्यायचे नाही. जेवताना आईने काटा काढून दिलेला मासा खायला जाम मजा यायची.
तेव्हा प्रत्येक गोष्ट आईपासून सुरु होऊन आईपाशी संपायची. अन् आज प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जाते. तेव्हा बाजारात जाताना आईने दिलेली १० रुपयाची नोटसुद्धा लाखमोलाची वाटायची अन् आज लाखभर रुपये पगार घेणारादेखील म्हाताऱ्या आईला सांभाळताना पैसे कमी पडतात म्हणून रडतो.
जग बदलतयं तशी माणसं बदलतायतं. माणूसकीची जागा आता पैशाने घेतलीयं. बालपण हरवलं तसतसं सगळचं हरवलं. आपणदेखील या जगाच्या रगाड्यात ओढले गेलो.
पण कधीकधी मागे वळून पाहताना मन भरुन येते.....
काही आठवणी डोळ्यांच्या कडा भिजवून जातात............. अन् सारं बालपण एका क्षणात डोळ्यासमोर उलगडवून जातात..........😊😢

No comments:

Post a Comment